A Rickshaw Puller's Controversial Remarks on the Marathi Language Issue Have Come to Light in Virar Yesterday : विरारमध्ये काल एका रिक्षाचालकाने मराठी भाषेच्या मुद्यावरून केलेला मुजोरपणा समोर आला आहे. मी मराठी बोलणार नाही. मी भोजपुरीमध्येच बोलणार मी हिंदीमध्येच बोलणार असे दादागिरी करत एका परप्रांतीय रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराबरोबर वाद घातला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून या प्रकरणी त्या मुजोर रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
एकीकडे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी मीरा-भाईंदरमध्ये काल शिवसेना आणि मनसे पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला तर दुसरीकडे विरारमध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने भाषेवरून वाद निर्माण करून मराठी बोलण्यास नकार दिला. विरार रेल्वेस्थानकाजवळ काल एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचालकाचा किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. थोड्याच वेळात तो वाद इतका टोकाला पोहोचला की त्यातून रिक्षाचालक भडकला आणि त्याने रागानेच इथे हिंदीमध्ये बोलायचं मराठी बोलायच नाही अश्या धमक्या द्यायला सुरुवात केली.
संबंधित दुचाकीस्वार मराठीमध्ये बोलत होता. त्याला या रिक्षाचालकाने धमकी द्यायला सुरुवात केली. मी मराठी बोलणार नाही मी हिंदीमध्ये आणि भोजपुरीमध्येच बोलणार असे तो मोठमोठयाने ओरडायला लागला. दुचाकीस्वाराने त्याला सुरुवातीला मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह केला होता ,मात्र मुजोर रिक्षाचालकाने त्या तरुणावर दादागिरी करत धमक्या द्यायला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने दुचाकीस्वाराने यामध्ये माघार घेतली आणि "हा माझं चुकलं भाऊ, जाऊदे रे बाबा", अश्या शब्दात त्याची माफी मागितली. दरम्यान हा सर्व प्रकार एका व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद करून सोशलमिडीयावर वायरल केला. यावेळी त्या रिक्षाचालकाने मीडियाको बुलाओ .. मै हिंदीमे बोलुंगा ... अशी धमकीसुद्धा त्या तरुणाला दिली
विरार स्टेशन परिसरात रिक्षा चालक व दुचाकीस्वार तरुणाचा मराठी भाषेवरून पुन्हा हा नवीन वाद सुरु झाला असून मुजोर रिक्षाचालक दमदाटी करत मराठीची गळचेपी करत असल्याचे त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यामुळे या परप्रांतीय रिक्षाचालकाची तक्रार करून त्याला चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.