राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी 17 जानेवारी रोजी बारामतीतील गोविंद बाग येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र आणण्याचा होता, अशी माहिती आता उघड झाली आहे.
ही बैठक गोविंद बागेत आयोजित करण्यात आलेल्या कृषी केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने झाली होती. उद्घाटन कार्यक्रमाच्या आडोशाला ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत राष्ट्रवादीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे, राजेश टोपे आणि हर्षवर्धन पाटील हे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र लढण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विशेषतः ‘घड्याळ’ या चिन्हावर पुन्हा एकत्र निवडणुका लढवण्याची शक्यता या बैठकीत तपासली गेली.
मात्र, या विलिनीकरणाला राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांचा विरोध असल्याची माहितीही समोर आली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी या एकत्रीकरणाबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाची स्वतंत्र ओळख, सत्तासमीकरणे आणि भविष्यातील राजकीय वाटचाल या मुद्द्यांवरून या नेत्यांनी विलिनीकरणाला विरोध केल्याचे सांगितले जाते.
या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतची चर्चा अधिक वेगवान झाली होती. खुद्द शरद पवार यांनीही नंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे मान्य केले होते. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला खंड पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. 17 जानेवारीला गोविंद बागेत झालेली ही बैठक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. या बैठकीमुळे दोन्ही गटांमध्ये सुसंवाद वाढला होता. भविष्यात राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल का, याबाबत उत्सुकता कायम असून पुढील राजकीय घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.