Chhatrapati Sambhajinagar : बुद्ध लेणीला स्फोटकांच्या धोक्यामुळे उच्च न्यायालयाची तात्काळ दखल Chhatrapati Sambhajinagar : बुद्ध लेणीला स्फोटकांच्या धोक्यामुळे उच्च न्यायालयाची तात्काळ दखल
ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : बुद्ध लेणीला स्फोटकांच्या धोक्यामुळे उच्च न्यायालयाची तात्काळ दखल

बुद्ध लेणी धोका: उच्च न्यायालयाची तात्काळ दखल, अवैध उत्खननामुळे लेण्यांना धोका.

Published by : Team Lokshahi

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरजवळील ऐतिहासिक बुद्ध लेणींना अवैध उत्खनन व ब्लास्टिंगमुळे धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब उघड झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची तात्काळ दखल घेतली आहे. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने याचिकेत सहाय्य करण्यासाठी अँड.चंद्रकांत थोरात आणि अँड. प्रशांत नागरगोजे यांची 'न्यायालय मित्र' (Amicus Curiae) म्हणून नियुक्ती केली आहे.

बुद्ध लेणी या भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या असून, त्यांच्याजवळ दररोज बेकायदेशीर उत्खनन, जेसीबी, पोकलेन व जिलेटिनचा वापर करून मुरूम काढण्याचे प्रकार सुरू आहेत, असा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. या ब्लास्टिंगमुळे लेण्यांना हादरे बसत असून भेगा पडण्याच्या घटनाही घडत आहेत. खंडपीठाने याबाबत राज्याचे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांना माहिती सादर करण्यास सांगितले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर तात्काळ अहवाल मागविण्यात आला असून विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. न्यायालयाने पुढील कारवाईसाठी 'न्यायालय मित्रां'ना याचिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लेणी परिसरात ३०० मीटर अंतरावर उत्खनन सुरू असल्याचे कारण देत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जबाबदारीपासून हात झटकले आहेत. शुक्रवारीदेखील ६ जेसीबी आणि ३ ट्रकच्या सहाय्याने मुरूम काढण्याचे काम सुरू होते. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना याची माहिती असूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. लेणीमध्ये वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी भेगाही पडल्या आहेत. पर्यटकांसाठी सतर्कतेचे फलक लावण्यात आले असले, तरी अवैध उत्खननामुळे या ऐतिहासिक वारशाला मोठा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या संवेदनशील मुद्द्यावर अधिकृत लक्ष केंद्रीत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या लेण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी यंत्रणांवर आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा