धार्मिक पूजेत सहभागी होण्यासाठी मासिक पाळी थांबवण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे अवघ्या १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत तरुणीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील ही घटना असून घरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी तरुणीने ‘अनमोल’ कंपनीच्या गोळ्या घेतल्या होत्या. मात्र औषध घेतल्यानंतर काही तासांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी अंत झाला.
डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशा प्रकारच्या गोळ्यांचा शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. या औषधांमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं, रक्त गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो, तसेच हृदयविकाराचा झटका येणं किंवा मूत्रपिंडासह इतर अवयव निकामी होण्याची शक्यता असते. विशेषत: वैद्यकीय सल्ल्याविना अशा औषधांचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी याची नोंद घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. मासिक पाळी थांबवण्यासाठी मनमानीपणे औषधं घेणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेत कृत्रिम हस्तक्षेप केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी अशा प्रसंगी नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.