जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एका 13 वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेजस गजानन महाजन या मुलाचा मृतदेह शेजारच्या शेतात आढळून आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ही हत्या नरबळीच्या उद्देशाने झाली असावी असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
रिंगणगाव येथील रहिवासी असलेला तेजस महाजन हा सोमवारी संध्याकाळी बाजारात गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. एका दुकानातून बिर्याणी घेतल्याचे शेवटचे त्याचे दर्शन झाले होते. सायंकाळी सात वाजल्यानंतर तो कुणालाच दिसला नाही. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी सुरू ठेवला होता. अखेर मंगळवारी पहाटे, खर्ची गावाजवळील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या भीषण हत्येची माहिती मिळताच एरंडोल पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले असून, घटनास्थळी साक्षी, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
ही हत्या केवळ व्यक्तिगत वैरातून की इतर कोणत्या उद्देशाने झाली, याचा तपास सुरू असतानाच नरबळीच्या शक्यतेने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. बालकाचे वय, घटनेची वेळ आणि मृतदेहाच्या अवस्थेवरून गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संशय निर्माण झाला आहे. मयत तेजसच्या बेपत्ताची नोंद एरंडोल पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही शोधमोहीम हाती घेतली. मृतदेह सापडताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे. कोणतेही सुराग मिळवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीवर आधारित तपास करत आहेत.