Dombivli Crime News : डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकाने गळफास लावून आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीमध्ये रिक्षा आणि कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंजाजी शेळके या रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची दुःखद घटना घडली आहे. कारमालकाने मारहाण करुन नुकसानभरपाई म्हणून २ लाखांची मागणी केली होती. तसेच त्या रिक्षाचालकाला पहाटे ३ वाजेपर्यंत एका खोलीत डांबून ठेवल्यामुळे रिक्षाचालकाला मानसिक धक्का बसला. त्यामुळे रिक्षाचालकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीमधील मोठागावमध्ये मुंजाजी शेळके या 70 वर्षीय रिक्षाचालकाने आकाश म्हात्रे या कारचालकाच्या गाडीला धडक दिली. त्या रागात कारचालकाने त्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत त्यांना एका खोलीत डांबले. आणि 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यांना पहाटे ३ च्या सुमारास कारचालकाने सोडले. त्या रिक्षाचालकाला या गोष्टीमुळे मानसिक धक्का बसला. दोन लाख रुपयांचा बंदोबस्त कुठून करायचा या विचारात ते होते. आणि त्याच विचारात त्यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी शेळकेंच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला जाऊन आकाश म्हात्रेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
जर कारचालकाचे नुकसान झाले होते तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याबाबत तक्रार करायला हवी होती असे शेळकेंच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा शेळकेंच्या नातेवाईकांनी पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी आकाश म्हात्रे या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस तपास चालू असून या घटनेमुळे डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.