थोडक्यात
मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी
खबरदारी म्हणून कोर्टाचा परिसर तात्काळ रिकामा
खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला.
दिल्ली हायकोर्टात शुक्रवारी (12 सप्टेंबर 2025) गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी साडेआठच्या सुमारास बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर अनेक खंडपीठांची सुनावणी तत्काळ थांबवण्यात आली.
धमकीचा मेल मिळाल्यानंतर सुरक्षेसाठी दोन अग्निशमन वाहने, दोन रुग्णवाहिका आणि बॉम्ब निकामी पथकाचे वाहन न्यायालय परिसरात दाखल करण्यात आले. पोलिस व सुरक्षा दलांनी न्यायमूर्तींचे चेंबर तसेच न्यायालयीन कक्षांची तपासणी सुरू केली आहे. इमारत रिकामी करण्यात आल्याने वकील, पक्षकार व कर्मचारी हे बाहेर लॉनवर थांबलेले दिसले.
पोलिसांनी सांगितले की, सकाळी ई-मेलद्वारे न्यायालयीन परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. अग्निशमन दल, बॉम्ब निकामी पथक आणि डॉग स्क्वॉड सध्या परिसरात सतत तपासणी करत आहेत. या घटनेनंतर हायकोर्ट परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.