कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी परिसरातील मंगलराघो नगरमध्ये आज, मंगळवारी दुपारी अचानक सप्तश्रुंगी इमारतीचा स्लॅब पडला. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी असल्याचे समजते. दुसऱ्या मजल्यावरून खालच्या मजल्यापर्यंत हा स्लॅब कोसळल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले असून 75 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असल्याचे प्राथमिक वृत्त समजते. ही घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे कार्यकर्ते आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तिथे हजर झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना तात्काळ खासगी रुग्नालयात दाखल केले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. काही जखमींना वाचवण्यात यश आले असून हा स्लॅब पडण्यामागचे नेमके कारण काय, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.