आज सकाळी 9 च्या सुमारास दौंड पुणे डेमो ट्रेनमध्ये पुणे रेल्वे स्थानकादरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. दौंडवरून ही रेल्वे दररोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुण्याकडे यायला निघते. दौंड पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये ही अचानक आग लागल्यामुळे प्रवासी घाबरले. मात्र आग विझवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असुन कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दौंड वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या डेमो रेल्वेच्या डब्यामध्ये अचानक धुर दिसू लागला आणि प्रवासी घाबरले. दौंड मधून निघालेली ट्रेन पुणे रेल्वे स्थानका दरम्यान आली असता ट्रेनच्या इंजिन पासून तिसऱ्या भोगीमध्ये बाथरूममध्ये अचानक आग लागली त्यावेळी त्या बाथरूममध्ये एक व्यक्ती अडकल्याचे लक्षात आले. इंजिन पासून तिसऱ्या बोगीच्या बाथरूम मध्ये ही आग लागल्याने तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. मात्र बाथरूममध्ये अडकलेल्या व्यक्तीकडून दरवाजा लॉक झाल्यामुळे आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी धुराचे लोट दिसू लागले आणि प्रवाशी घाबरले. त्यावेळी प्रवाशांनी शर्थीचे प्रयत्न करून बाथरूमचा दरवाजा तोडला आणि त्या प्रवाशाला वाचवले. याप्रकरणी तात्काळ स्टेशन मास्तरांना सांगण्यात आले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व यंत्रणांची योग्य तपासणी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडुन होत आहे. मात्र या घटनेमुळे बराच वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.