थोडक्यात
पुणे जिल्ह्यातील शिरूर व खेड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले.
पिंपरखेडमध्ये अल्पवयीन मुलांवर व वृद्ध महिलांवर जीवघेणे हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यापासून थोडक्यात वाचला असून हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर व खेड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. पिंपरखेडमध्ये अल्पवयीन मुलांवर व वृद्ध महिलांवर जीवघेणे हल्ले झाल्यानंतर आता खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा चिमुकला मांजरीच्या मागावर आलेल्या बिबट्याच्या हल्ल्यापासून थोडक्यात वाचला असून हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काळेचीवाडीतील एका घराच्या अंगणात लहान मुलगा झोका घेत होता. त्या वेळी घराच्या परिसरात फिरणाऱ्या मांजरीच्या पाठलागात बिबट्या अचानक कंपाउंडमध्ये घुसला. झोक्यावर असलेल्या चिमुकल्याच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर बिबट्या आला. प्रसंगावधान राखत मुलाने झोक्यावरून उतरून तातडीने घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पुन्हा शेताच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आले.
ही घटना घडण्यापूर्वीच शिरूर तालुक्यात पिंपरखेड गावात बिबट्याने अल्पवयीन मुलगी शिवन्या बोंबे, त्यानंतर 70 वर्षीय भागाबाई जाधव आणि अलीकडेच 14 वर्षीय रोहन बोंबे यांचा बळी घेतला होता. सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला होता. यातून उद्रेक झालेल्या लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन आणि जाळपोळ केली होती. अखेर वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार केले; परंतु एकाचा बंदोबस्त केल्यानंतरही परिसरात बिबट्यांची हालचाल कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट; वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी या नव्या घटनेनंतर परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी वनविभागाला त्वरित पिंजरे, रात्री गस्त वाढवणे आणि बिबट्यांच्या हालचालींवर कठोर नजर ठेवण्याची मागणी केली आहे. शाळेत जाणारी मुलं, शेतात काम करणारे शेतकरी आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, "नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतरही हल्ले सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर आणखी मोठी दुर्घटना घडू शकते." वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळेस सावध राहण्याचे, एकटे बाहेर न पडण्याचे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, "नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतरही हल्ले सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर आणखी मोठी दुर्घटना घडू शकते." वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळेस सावध राहण्याचे, एकटे बाहेर न पडण्याचे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.