मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारा सुजीत दुबे या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अंधेरीतील सुंदर नगर परिसरातील दुबेच्या वॉशिंग सेंटरवर तोडफोड केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुजीत दुबे याला अटक केली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दुबेचे वॉशिंग सेंटर हे अनधिकृत असून त्यातून अमली पदार्थांची देवाणघेवाण होत असल्याचा संशय आहे.
तोडफोडीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणत दुबेच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सुजीत दुबे आणि त्याचा एक साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनसे कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की महाराष्ट्रात राहून कोणीही राज ठाकरे यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली, तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. पोलिसांनी मात्र कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जनतेला केले आहे.