सध्या युट्यूबवर मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या एका व्हिडिओने सर्वत्र खळबळ माजली आहे. Capital TV चॅनेल नावाच्या युट्यूब चॅनेलने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात अशी माहिती होती की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 500 रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बाद करण्यावर काम करत आहे, मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की 500 रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहेत की नाही.
यादरम्यान आरबीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. 500 च्या नोटा अजूनही कायदेशीर चलनातील आहेत आणि अजूनही देशभरात जारी आणि स्वीकारल्या जात आहेत. आरबीआय परिपत्रकाने त्याला पाठिंबा दिलेला नाही. एप्रिल 2025 मध्ये आरबीआयने बँकांना सूचित केले की, एटीएममधून 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा वितरित करून जनतेला या नोटांची उपलब्धता वाढवावी. बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स यांनी हे निर्देश टप्याटप्प्याने लागू करावेत.
जनतेपर्यंत वारंवार वापरल्या जाणाऱ्या नोटा पोहोचवण्यासाठी सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) यांनी त्यांच्या एटीएममध्ये नियमितपणे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एका परिपत्रकात सांगितले आहे. तसेच पुढे असं म्हटलं आहे की, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 75% एटीएममध्ये कमीत कमी एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा असतील.
31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएममध्ये कमीत कमी एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा असतील. याचा 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याशी काहीही संबंध नाही. हे फक्त कमी मूल्याच्या नोटा, ज्या दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जातात, त्या लोकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी आहे.