यवतमाळमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पाहायला मिळत आहे. एका विधवा स्त्रीला तिच्या सासरच्यांनी गुजरातमधील एका व्यक्तीला चक्क 1 लाख 20 हजारांना विकल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातून हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी तिच्या सासू, सासूचा दुसरा पती, दीर, नणंद आणि नंदोई यांच्याविरुद्ध मानवी तस्करी आणि शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
यवतमाळमध्ये आर्णी या गावी एक महिला तिच्या पतीच्या निधनानंतर आपल्या दोन मुलांसह उदरनिर्वाह करत होती. तिच्या अश्या असाह्ययतेचा फायदा घेत तिच्या सासरच्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याने तिला विकण्याचा प्लॅन बनवला. तिला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला भुलवून मध्यप्रदेशात आणले गेले. त्या महिलेला सुद्धा आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे ती या गोष्टीला तयार झाली.
मात्र तिथे गेल्यानंतर एक वेगळेच चित्र त्या महिलेपुढे उभे राहिले. तिच्या सासरच्यांनी तिला फसवून गुजरातमधील पोपट चौसाणी याकडून 1 लाख 20 हजार रुपये घेऊन त्या महिलेला त्याला विकले. यानंतर सुद्धा तिच्या मागच्या यातना संपल्या नाहीत. त्या व्यक्तीने सुद्धा त्या निराधार महिलेचा दोन वर्ष सतत शारीरिक आणि मानसिक शोषण केले.त्या व्यक्तीने त्या महिलेशी विवाह झाल्याचे भासवून तिचे अतोनात हाल केले. जेव्हा त्या व्यक्तीपासून त्या महिलेला एक मुलगा झाला तेव्हा त्या व्यक्तीने त्या महिलेला तिच्या गावी परत आणून सोडले.
दरम्यानच्या काळात त्या विधवा निराधार महिलेच्या आईवडिलांनी ती महिला आणि दोन मुले हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. त्या तपासात ही महिला त्याच गावी अखेर सापडली आणि हा क्रूर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तिची सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मात्र यामध्ये त्या महिलेचा मुलगा आणि मुलगी बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. या घटनेमुळे यवतमाळमधील आर्णी गावात संतापाची लाट पसरली असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.