बंगळुरूमधील महानगरपालिका क्षेत्रातील एका कचऱ्याच्या ट्रकमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कचऱ्याच्या डब्यात एका बॅगमध्ये 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून या घटनेमुळे चन्नमनकेरे स्केटिंग ग्राऊंड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी केवळ 20 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला जेरबंद केले आहे.
आशा आणि तिचा प्रियकर मोहम्मद शम्सुद्दीन हे गेल्या दीड वर्षांपासून बंगळुरूमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. शम्सुद्दीन हा इसम मूळचा आसामचा असून त्याचे आधीच लग्न झालेले आहे. रविवारी रात्री दोघांमधील किरकोळ गोष्टीवरून वाद झाले. त्या रागाच्या भरात शम्सुद्दीन याने आशाला गळा दाबून मारले. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचे पाय गळ्याभोवती बांधून तिचा मृतदेह 20 किमी दूर महानगरपालिका क्षेत्रातील एका कचऱ्याच्या ट्रकमध्ये टाकला. सकाळी महापालिकेच्या सफाई कामगाराला याबाबतची माहिती मिळताच त्याने त्वरित पोलिसांना बोलावले आणि हा प्रकार उघडकीस आला. प्रथमदर्शनी त्या महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिला मारले असल्याचे वाटत होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे केवळ 20 तासांच्या तपासणीत बंगळुरू पोलिसांनी आरोपीला पकडले.
याप्रकरणी मोहम्मद शम्सुद्दीन याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. मोहम्मद शम्सुद्दीन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा