कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची संततधार कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यात जोरदार पावसाची नोंद झाली असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ होत आहे. जिल्ह्यातील सहा बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या सीमेवर दाखल झाला असून, पुढील काही दिवस कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ मे पर्यंत कोल्हापूर शहरात यलो अलर्ट तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट Orange alert देण्यात आला आहे. विशेषतः पुढील ३६ तास अत्यंत महत्वाचे ठरणार असून, घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे तेथेही जोरदार पाऊस सुरू आहे. आज मान्सून कोकणात आणि नंतर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागांत झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी १६ फूट ९ इंचांपर्यंत पोहोचली आहे. कसबा बावडा ते वडणगे मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून, प्रशासनाने सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स लावले आहेत. यावर्षी मे महिन्यातच बंधारा पाण्याखाली गेला आहे, ही बाब चिंता निर्माण करणारी आहे.