2007 साली ‘तारे जमीन पर’सारख्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणाऱ्या आमिर खानने आता ‘सितारे जमीन पर’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपटही लहान मुलांभोवती फिरणारा असून 20 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. मुलांसाठीच्या चित्रपटांना हिंदी सिनेमात कमी प्रतिसाद मिळतो हा समज खोटा असल्याचं आमिरचं मत आहे. त्याने सांगितलं की मुलं आज विविध परदेशी कार्यक्रम पाहतात, त्यामुळे आपल्याकडूनही त्यांच्यासाठी भारतीय मूल्ये आणि संस्कृती असलेले चित्रपट तयार व्हायला हवेत.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटातील मुलांनी सेटवर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली होती, असं सांगत आमिर म्हणतो की विशेष मुलांबरोबर काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. या मुलांनी ज्या सहजतेने आणि आनंदाने काम केलं, त्यामुळे संपूर्ण युनिट एकजुटीने आणि तणावमुक्त वातावरणात काम करू शकलं. “आपल्या आयुष्यात सगळं असूनही आपण अनेकदा दु:खी होतो, पण ही मुलं प्रत्येक क्षणी आनंदी असतात, याचं भान मला त्यांच्या सहवासात आलं,” असं तो म्हणाला. आमिरने हेही स्पष्ट केलं की चित्रपट कोणत्या महिन्यात प्रदर्शित होतो, यापेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्याच्या मते, चांगला आशय असलेला चित्रपट कोणत्याही काळात यशस्वी होतो. ‘सितारे जमीन पर’ पूर्ण झाल्यावर प्रदर्शनासाठी सर्वात जवळची तारीख जूनमध्ये मिळाली, म्हणून ती निवडण्यात आली.
चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या अफवांबाबतही आमिरने खुलासा केला. हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांशी थेट संबंध ठेवणं त्याला महत्त्वाचं वाटतं. “चित्रपटगृहातील अनुभव वेगळाच असतो आणि त्यातूनच सिनेसृष्टीला ऊर्जा मिळते,” असंही त्याने स्पष्ट केलं. चित्रपटगृहांची संख्या वाढणंही गरजेचं असल्याचं त्याचं मत आहे. तसेच, आमिरने तरुणांना समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला. “आपलं मानसिक आरोग्य समजून घेण्यासाठी आणि निर्णय योग्य घ्यायला समुपदेशन उपयुक्त ठरतं,” असं सांगून त्याने नातेसंबंधांतील प्रामाणिकपणावरही भर दिला.