लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बच्चू कडूंना थेट सल्ला दिला आहे. “पराभव मान्य करून आत्मपरीक्षण करा, उगीच आरोप-प्रत्यारोप करू नका,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अजित पवार म्हणाले,
“लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 खासदार निवडून आले आणि 31 पराभूत झाले. आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांच्यावर कुणाला दोष दिलाय का? शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे. आम्ही पुन्हा लोकांच्या समोर पाच महिन्यांनी गेलो. आणि 238 आमदार निवडून आणले.”
ते पुढे म्हणाले,
“यश मिळाल्यानंतर ते यश पचवायचा असतं आणि पराजय झाल्यानंतर पण खचून न जाता आत्मपरीक्षण करून पुन्हा उभं राहायचं असतं. उगीच कुणावर तरी आरोप करत बसायचं नसतं. पराभव मान्य करून कशामुळे पराभव झाला याचा अंतर्मुख होऊन विचार करावा आणि दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर जायला हवं.”
अजित पवारांनी बच्चू कडूंवर नाव न घेता टीका करताना त्यांना “निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, पण पराभवाचे कारण शोधा आणि आत्मपरीक्षण करा” असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चू कडूंनी अलीकडेच आपल्याला पराभूत करण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनीच काम केल्याचा आरोप केला होता. यावरच अजित पवारांनी प्रत्युत्तर देत पराभवाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा जनतेचा कौल मान्य करावा, असा सल्ला दिला आहे.