लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यावर्षी प्रचंड गर्दी उसळली होती. लाखो भाविकांच्या उपस्थितीत 32 ते 35 तास चाललेल्या या मिरवणुकीदरम्यान चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात सक्रियता दाखवली. पोलिसांच्या माहितीनुसार, 100 हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या असून अनेक सोन्याच्या साखळ्या देखील लंपास झाल्या आहेत.
कालाचौकी पोलिस ठाण्यासमोर तक्रार नोंदवण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. आतापर्यंतच्या चौकशीतून 4 मोबाईल परत मिळाले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, सोन्याच्या साखळी चोरीच्या 7 गुन्ह्यांपैकी दोन साखळ्या जप्त करण्यात आल्या असून 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबईतील भोईवाडा पोलिसांनी विसर्जनावेळी ड्रोनच्या चुकीच्या वापराबाबत देखील प्रकरणे दाखल केली आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आणि कडक सुरक्षा उपाययोजना असतानाही अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, धार्मिक आणि गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना मोबाईल, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील लालबाग परिसरात मोबाईल चोर आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांची विशेष सक्रियता दिसून आली आहे.