मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि कवितेच्या जगतातील मानाचे नाव असलेले अभिनेते-कवी किशोर कदम उर्फ कवी सौमित्र सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. अंधेरी (पूर्व) चकाला येथील त्यांच्या राहत्या घरावर बेघर होण्याचे ढग दाटले असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर भावनिक स्वरूपाची पोस्ट शेअर करत कदम यांनी उघड केले की, त्यांच्या सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत बिल्डर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) यांच्या संगनमताने फसवणुकीचा डाव रचला गेला आहे. “मी आणि इतर 23 रहिवासी आमच्या छताखालील सुरक्षितता गमावण्याच्या उंबरठ्यावर आहोत,” असे ते म्हणाले.
कदम यांच्या मते, सोसायटी कमिटीच्या काही सदस्यांनी महत्वाची कागदपत्रे लपवून, अपुरी माहिती देत आणि दिशाभूल करून, चकाला सारख्या प्राईम लोकेशनमधील त्यांच्या इमारतीला DCPR 33(11) आणि 33(12)B अंतर्गत SRA/स्लम डेव्हलपमेंट योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार त्यांना नुकताच समजला.
ते पुढे म्हणाले, “कमिटी जर जागरूक नसेल, रहिवाशांच्या हिताचा विचार करत नसेल, आणि बिल्डर व PMC च्या प्रभावाखाली काम करत असेल, तर सामान्य माणसांची घरे ट्रान्झिट कॅम्पमध्ये बदलण्याचा धोका निर्माण होतो. ‘अंधेरी हवा मेहेल सोसायटी’ त्याचं जिवंत उदाहरण आहे.”
कदम यांनी बहुमताच्या (मेजॉरिटीच्या) कायद्याचा गैरवापर कसा होतो, यावरही टीका केली. त्यांच्या मते, जो सदस्य कायदेशीर प्रश्न विचारतो, चुकीकडे बोट ठेवतो, त्याला WhatsApp ग्रुपमधून बाहेर काढणे, महत्त्वाची माहिती दडवणे, इतरांना त्याच्या विरोधात भडकवणे आणि ‘रिडेव्हलपमेंटविरोधी’ अशी प्रतिमा तयार करणे – हा प्रकार एका प्रकारचा “शहरी अत्याचार” आहे. दुर्दैवाने, अशासाठी कायद्यात कोणतीच तरतूद नाही, असे ते म्हणाले.
मुंबईसारख्या महानगरात बिल्डर आणि PMC यांची आर्थिक ताकद इतकी प्रबळ आहे की, सामान्य नागरिकांना वर्षानुवर्षे लढा देऊनही न्याय मिळणे कठीण जाते, असे त्यांनी नमूद केले. अनेक अशी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
या पार्श्वभूमीवर, किशोर कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि महाराष्ट्रातील जनतेला “एका कलावंताचं घर वाचवा” अशी कळकळीची विनंती केली आहे.