ताज्या बातम्या

Late Raj Kapoor Life Gaurav Award : काजोल पुरस्कार घेताना भावूक म्हणाली, "आज मला वाटतं..."

राज कपूर पुरस्कार: काजोलच्या 33 वर्षांच्या योगदानाचा गौरव, वाढदिवसाच्या दिवशी विशेष सन्मान.

Published by : Riddhi Vanne

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं. 5 ऑगस्ट 2025 रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित 60 वा आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा विशेष स्वरूपात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या भव्य सोहळ्यात काजोलला हिंदी मनोरंजन क्षेत्रातील 33 वर्षांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे याच दिवशी काजोलचा 51 वा वाढदिवस होता, त्यामुळे हा सन्मान तिच्यासाठी अधिकच खास ठरला. या पुरस्कारासोबत तिला सन्मानचिन्ह आणि 6 लाख रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं.

पुरस्कार स्विकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना काजोल म्हणाली,

“आज माझा वाढदिवस आहे. इतक्या मान्यवरांसमोर मी मंचावर उभी आहे. माझ्यासाठी हा दिवस फार मोठा आहे. कारण माझी आई (तनुजा) समोर बसली आहे असून मी तिचीच साडी नेसली आहे. विशेष म्हणजे तिलाही याच मंचावर याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या दिवशी हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. आज मला वाटतं ,मी आयुष्यात नक्कीच काहीतरी केलंय.”

काजोलच्या कामांबद्दल बोलण्याचे झाले तर, काजोलने 1992 साली आलेल्या 'बेखुदी' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'गुप्त', 'फना', 'कभी खुशी कभी गम', 'माई नेम इज खान' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमधून तिने आपली अभिनयक्षमता सिद्ध केली. तिच्या भूमिकांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनातही घर केलं.

ती केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. 2011 साली भारत सरकारने काजोलला 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आजही ती तितक्याच जोशात, स्वतःच्या अनोख्या शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या पुरस्कारामुळे केवळ तिच्या कारकिर्दीला नव्हे, तर तिच्या वाढदिवसालाही एक अविस्मरणीय आठवण लाभली आहे. काजोलसारख्या अभिनेत्रींमुळे भारतीय सिनेसृष्टी समृद्ध होत गेली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : दादरच्या कबुतरखान्याचा वाद हायकोर्टात, आज सुनावणी

Latest Marathi News Update live : मुंबईतील बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना, मनसेची युती

चौथ्या राज्यस्तरीय राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुर्यकांत नामगुडे यांची निवड

आजचा सुविचार