मराठी आणि हिंदी मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधन झाले आहे. केवळ 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज म्हणजेच रविवारी पहाटे कर्करोगाशी झुंज संपली. तिच्या अश्या अचानक जाण्याने कलाविश्वात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एक भावनिक पोस्ट शेअर करत आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रार्थना बेहेरे पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री , ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... ❤️ आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्तास बोलत बसायचो…
मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं – त्या क्षणांना काही तोड नाही
ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं.
अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख चेहरा , तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला , ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला.
कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती.
मी, ती आणि शाल्मली — आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे.
ती खूप आनंदी होती… तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, “तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.”
कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे.
माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे — कायमचा.