मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवार, 22 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींनी ही आत्महत्या आर्थिक अडचणींमुळे झाली असावी असं म्हटलं, तर काहींनी कौटुंबिक कारणांचा उल्लेख केला आहे.
तुषारच्या जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी त्याच्याकडे कामाची कमतरता नव्हती, असे नमूद करत त्याच्या आत्महत्येचं कारण वेगळं असावं, अशी शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर, त्यांच्या अस्थिर आयुष्यावर आणि मदतीच्या गरजेवर सडेतोड भाष्य केलं आहे.
विशाखा सुभेदार यांची पोस्ट जशीच्या तशी
रंगभूमी बळ देते.. असं म्हणता म्हणता.. वाईट बातमी.. Tushar Ghadigaonkar ह्या रंगकर्मीची..! खरंतर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेज चे.. अभिनय कडून अनेकदा त्याच नाव ऐकलेले... भेटले ही होते, काम नव्हतं केलं... पण भयानक वाईट घडले.. हिच जी phase येते त्या वेळीस बोलायला हव, मार्ग निघतो.. (एडिट करतेय) मंडळी क्षमस्व.. माहिती जी मला मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाहीय हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले.
त्या बद्दल मित्रां माफ कर मला..! तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते... वाईट झालं. सांगो वांगी जे कानावर पडल त्यामुळे share कराव वाटलं. पण तरीही माझा मुद्दा खोडावा असं वाटत नाहीय.. कलाकारांना अर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी ह्यासाठी फंड करावा असं खुप वाटतं.. नंतर ते पैसे कमवून त्यांनी फेडावे..! सोसायटी मधून कसं लोन घेता येतं अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा... त्याची काहीतरी सिस्टिम असावी.. परतफेडीचे नियम नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा..!
रंगमंच कामगार संघटना आहे, जुनियर artist साठी त्यांची संघटना आहे.. संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांच होत नाही. कारणं माहित नाही..! मदत करतात ही काही मित्र मैत्रिणी पण नंतर ते ही पाठ फिरवतात. त्याला दोषी ही काही कलाकार आहेतच जे पेसे घेऊन गूल होतात.. त्याच पैशांची दारू पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे.. फार दुष्ट चक्र आहे हे.. पण तरीही.. काहीतरी मार्ग काढायला हवा..! ताकद, बळ, द्यायला हवं.
हातात कामं नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारत्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जात.. आमचं फिल्ड बेभरवशाच.. त्यामुळे ही phase प्रत्येकाला फेस करावीच लागते.. साहित्य, नाट्य, संमेलनासाठी दिला जातो त्यातुनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का?? किंवा जसं नाटक सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तस कलाकार जगावा, (प्रामाणिक पणा पडताळून घ्यावा हव तर) तर त्यासाठी वरदान / जीवदान.. असं काही स्कीम करता येईल का?? एक भाबडा विचार..!
त्याला ही अनेक फाटे फुटतील च.. पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल. पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणी नों..???? ही वेळ कोणावरही येऊ शकते.. पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया. स्वतःचा संसार चालवण हे ज्याच्या त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो त्यासाठी काहीतरी स्कीम, प्रॉव्हिजन बांधू शकतो का आपण???
या पोस्टमधून विशाखा सुभेदार यांनी कलाविश्वातील वास्तव अत्यंत थेट शब्दांत मांडलं आहे. त्यांच्या या भावनिक आणि मार्मिक आवाहनामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं असून, अनेकांनी त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला आहे. आता यानंतर खरंच कलाकारांसाठी आर्थिक स्थैर्य देणारी एखादी ठोस योजना अस्तित्वात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा