महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. तसच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
कोणत्या अर्जांची पडताळणी होणार?
1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार स्क्रुटिनी
2) चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी
3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार स्कुटीनी
4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.