राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिल्यानंतर त्यांना मे महिन्याचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. मे महिना संपून आता जून महिना सुरू झाला असून गेल्या महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार, अशी विचारणा राज्यातील लाभार्थी महिला करत आहेत. यावर महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज भाष्य केले असून लवकरच लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हफ्ता मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या की, "जानेवारी महिन्यात जी तडताळणी झाली. त्यातच लक्षात आलेलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. साधारण २ लाख नावांचा डेटा आम्ही पाहिला, त्यातील त्या अडीच हजार महिला होत्या. तेव्हापासून त्या सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देणं बंद केलं आहे. तर राज्यातील लाभार्थी महिलांचा एप्रिलप्रमाणेच मे महिन्याचाही हफ्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल," असेही त्यांनी नमूद केले.