राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलंय, त्यासाठी आम्ही दिल्लीला चाललोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. राज्यात एकीकडे कबूतरखाने आणि माधुरी हत्तीणचा विषय जोरदार चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीला जात आहेत.
आदित्य यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती देत कबुतरखाने बंद होत असल्याच्या निर्णयावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला. कबुतरांच्या कंट्रोल फिडींगवरुन टोला लगावला आहे. कबुतरं म्हणजे काय शिंदेंचे आमदार नाहीत, कंट्रोल फिडींग करायला, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान, शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंसह गुवाहटीला गेले होते. तेव्हा भाजपनेच त्यांना मदत केली होती. त्यावरुन, आदित्य यांनी टोला लगावला.
मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री असूनही कबुतरखान्याबाबत बीएमसीला लेटर देतात हे धक्कादायक आहे. मात्र, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत. मंगलप्रभात लोढा हे वरळी सी फेसला बंगला बांधत आहेत, तिथे कबुतरांची चांगली व्यवस्था होईल, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. बीडीडी चाळवासियांना घराच्या चाव्या देण्याबाबत सरकारमध्ये श्रेयवाद आहे. बीडीडी प्रकल्प सुरू झाल्यानंतर म्हाडासोबत नियमित बैठका घेतल्या. त्यामुळे, दोन टॉवरचा चावी वाटपाचा कार्यक्रम घ्या.
बीडीडी रहिवाशांचा यंदाचा गणेशोत्सव नव्या घरातच हवा, मंत्रिमंडळात काही श्रेयवाद आहे का? लाभधारकांना चाव्या मिळाव्यात, अशी भावना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. दरम्यान, ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणावरुन होत असलेल्या टीकेवरही त्यांनी पलटवार केला. दोन भाऊ एकत्र येत असतील तर ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांचं काय, असे म्हणत आदित्य यांनी महायुतीच्या व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावला.