महाराष्ट्रात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे. आज सकाळपासूनच अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे कोकण व मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती तसेच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.
भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा देत राज्यातील अनेक भागांत पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरासोबतच मध्य प्रदेश भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाची तीव्रता वाढली आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली व घाटमाथ्याच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांतही सकाळपासूनच जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाची ही जोरदार सुरुवात प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करत आहे. मुंबईत पावसामुळे रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीसह रेल्वे सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.