ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवे वादंग निर्माण झाले आहे. या व्हिडिओत हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर माळी समाजासह इतरांकडून नाराजी व्यक्त होत असून हाके अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
काय आहे व्हायरल वक्तव्य?
समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडिओत हाके म्हणताना दिसतात – “काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ...” असं वाक्य त्यांनी उच्चारल्याचा दावा करण्यात येतो. पुढील भागात ते काही बोलताना दिसत असले तरी आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. या वक्तव्याचा संदर्भ मंत्री छगन भुजबळ यांच्याशी जोडला जात असल्याचं म्हटलं जात आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं. “हा व्हिडिओ माझा आहे, मात्र त्यातील आवाज माझा नाही. समाजात फुट पाडण्यासाठी आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्यासाठी हा कट रचला जात आहे. मी असं वक्तव्य करायला काही वेडा नाही,” असा दावा त्यांनी केला. हाके यांनी जरांगे यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांची अडचण वाढल्याचं बोललं जात आहे.
या प्रकरणावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियावर आम्हीही हा व्हिडिओ पाहिला. नुकताच माळी समाजाने हाके यांचा सत्कार केला होता. त्याच नेत्यांच्या तोंडून असं वक्तव्य बाहेर येणं दुर्दैवी आहे. त्यांनी बोललं किंवा नाही, हे सांगता येत नाही, पण व्हिडिओत ते बोललेले दिसतात. यावर आता तेच प्रतिक्रिया देतील.”