राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या सरींनंतर हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून हे चक्रीवादळ सध्या वायव्य दिशेने सरकत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मोंथा मंगळवारपर्यंत उपसागराच्या पूर्वमध्य भागात पोहोचून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तथापि, महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, अधूनमधून सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाचा इशारा असलेले भाग:
यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सोमवारी मुंबईतही सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. फोर्ट, दादर, वरळी, परळ, घाटकोपर, अंधेरी आणि बोरिवली भागांत सरी कोसळल्या. दिवसभरच्या उकाड्यानंतर या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३३.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. ‘मोंथा’पूर्वी ‘शक्ती’ हे यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत निर्माण झाले होते. त्यानंतर आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तयार झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरी किनाऱ्याला फटका दिला होता.
राज्यात सध्या हवामान बदलत्या स्थितीत असून, पुढील काही दिवस पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.