राज्याच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय असलेल्या पवार कुटुंबात यंदा आनंदाचे वातावरण आहे. या वर्षी पवार कुटुंबात दोन विवाहसोहळे होणार असून, संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येणार आहे. पहिल्या विवाहसोहळ्याचे केंद्रबिंदू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार. त्यांचा आणि उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये पार पडला आहे. आता त्यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे.
दुसरी आनंदाची बातमी अजित पवार यांच्याविरोधात राजकीय भूमिका घेणारे आणि शरद पवार गटातील सक्रिय युवा नेता युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याची आहे. युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमधून दिली आहे. “माझा भाचा युगेंद्रचा साखरपुडा तनिष्काशी झाला आहे! त्यांना प्रेम, हास्य आणि सुखी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा,” असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच, “तनिष्काचे कुटुंबात स्वागत करताना खूप आनंद होत आहे,” असाही उल्लेख त्यांनी केला.
या दोन्ही साखरपुड्यामुळे वैयक्तिक पातळीवर पवार कुटुंबात एकत्र येण्याची संधी निर्माण झाली आहे. राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र येते, हे पुन्हा एकदा दिसून येणार आहे. त्यामुळे या दोन विवाहसोहळ्यांमुळे विभक्त वाटचाल करणाऱ्या या कुटुंबातील नात्यांमध्ये सौहार्दाचे दृश्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी हे दोन्ही विवाहसोहळे पार पडणार असल्याने, राजकीय वर्तुळात याचीही उत्सुकता आहे की, पवार कुटुंबातील कोणकोणत्या सदस्यांची यावेळी उपस्थिती लागेल आणि यातून कोणते सामाजिक संकेत दिले जातील.