राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा विरोधात मोहिम उघडली होती. त्याच्यासाठी शिंदे गटाच्या एका नेत्याने 'बुक माय शो' वरुन कुणाल कामराचे कार्यक्रम हटविण्याचा दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर कुणाल कामराने 'बुक माय शो' ला पत्र पाठवून यादीतून नाव काढू नये. आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पत्न मिळालं याची माहिती द्यावी अशी मागणी कुणालने केली होती.
याचसंदर्भात 'बुक माय शो' ने कुणालच्या पत्राचे उत्तर दिले आहे. उत्तरामध्ये 'बुक माय शो' लिहिले आहे की, "आमच्या व्यासपीठावरुन आम्ही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीपासून रोखू शकत नाही. कोणत्याही कार्यक्रमातील आशय ही संबंधीत कलाकार आणि आयोजकांची जबाबदारी असते, आमची नाही".