जगभरात निदर्शनांची एक नवीन लाट उसळत आहे, जी सरकारविरुद्ध पिढ्यानपिढ्या असमाधान आणि तरुणांमधील संतापामुळे प्रेरित आहे. नेपाळनंतर आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या मादागास्कर या देशामध्ये जेन झी क्रांती झाली आहे. सोमवारी मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांना लष्करी बंडानंतर सत्तेवरून आणि देशाबाहेर काढण्यात आले. जेन झींच्या तीव्र आंदोलनानंतर येथील सत्ता लष्कराच्या हाती आली आहे. ज्यामुळे आता कर्नल माइकल रॅड्रियनिरिना नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मादागास्करमध्ये जेन झी तीव्र होण्याचे कारण असे की, याठिकाणी एका विशेष लष्करी तुकडीने सरकारविरुद्ध भूमिका घेतली होती, ज्यामुळे या बंडाला समर्थन देत तरुणाईदेखील रस्त्यावर उतरली.25 सप्टेंबर रोजी पाणी आणि वीज टंचाईवरून निदर्शने सुरू झाली. यानंतर जनरल झेड तरुणांनी “जनरल झेड मेडागास्कर” म्हणून संबोधून या आंदोलनाला हेच नाव दिले. त्यानंतर हे आंदोलन हळूहळू भ्रष्टाचार आणि असमानतेविरुद्धच्या देशव्यापी निषेधात रूपांतरित झाले. ज्यामुळे या देशात सत्तांतर झाले असून राष्ट्रपती देश सोडून पळाले.
यावेळी मादागास्करमध्ये निदर्शक म्हणाले की, ते विशेषतः नेपाळ आणि श्रीलंकेतील चळवळींपासून प्रेरित होते. तसेच "आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आमची लढाई लढत आहोत" असे देखील ते म्हणाले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मते, या आंदोलनात आतापर्यंत किमान 22 लोक मारले गेले आहेत. या विरोधात तीन आठवड्यांपासून तरुण रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत.