लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये अंकिता लोखंडेची ऑनस्क्रीन बहीण म्हणून झळकलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं रविवारी (31 ऑगस्ट) निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून ती कर्करोगाशी लढा देत होती. वयाच्या केवळ 38व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने मराठी व हिंदी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रियाच्या निधनानंतर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत तिची बहीण साकारणारी अंकिता लोखंडे मात्र सोशल मीडियावर कुठेच दिसली नाही. सतत इंस्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या अंकिताने प्रियाविषयी एकही पोस्ट किंवा स्टोरी टाकली नाही. यामुळे अनेक नेटकरी भडकले असून, "तू खरंच तिची मैत्रीण होतीस का?", "प्रियासाठी एक ओळ लिहायला हवी होती", अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर करण्यात आल्या.
प्रियाच्या अंत्यसंस्काराला अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहेरे, शाल्मली टोळ्ये, जुई गडकरी, उषा नाडकर्णी यांच्यसह अनेक कलाकार उपस्थित होते. प्रार्थना बेहेरे तर आपल्या मैत्रिणीला निरोप देताना भावूक झाली. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींनीदेखील प्रियाबद्दल भावनावेगाने आठवणी व्यक्त केल्या. मीरा रोड येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत प्रियाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. तिच्या आकस्मिक जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.