तब्बल 20 वर्षानंतर मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मागील सगळे वाद विसरून आज अखेर एकत्र आले. मात्र हा मेळावा झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
आजच्या मेळाव्यावर भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया देत मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. "दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगलीच आहे. हे दोघे एकत्र आल्याने देशद्रोहींना आनंद झाला आहे. उद्धव ठाकरे यांना राज यांच्याबरोबर जावे लागले, म्हणजेच त्यांना राज यांचे पाय धरावे लागले. स्टेजवर जे दोन जण उभे होते त्यांचा विषय थेट आंतरपाटापर्यत गेला होता. त्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेने सांगावे. पण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून समजले असेल नवरी कोण?", असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.
पुढे नितेश राणे म्हणाले की, "आज बाळासाहेब असते तर फडणवीस यांचे त्यांनी अभिनंदन केले असते. स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे" अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. मुंबईतील हिंदू समाज यांना परत घरात बसवणार असंही ते म्हणाले. यावेळी सुद्धा निवडणुकीत आम्हीच जिंकणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर बाळासाहेबांचा आशीर्वाद फडणवीससाहेबांच्या डोक्यावर आहे. त्याचसोबत मोदी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकायची यांची लायकी नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.