थोडक्यात
मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ
रामदास कदम यांच्या 'त्या'दाव्यानंतर थेट अब्रुनुकसानीचा दावा
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले
नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे त्यांनी म्हटले. रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. मी हे फार मोठं विधान करतो आहे, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर राजकारणात मोठा भूकंप आला. आता अनिल परब (Anil Parab) यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे.
अनिल परबांनी थेट म्हटले की, मी रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहे. रामदार कदम यांची नार्काे टेस्ट झालीच पाहिजे. योगेश कदम यांनी बापाचे उद्योग तपासली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्राचा मी स्वत: साक्षीदार आहे. रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत. 1993 मध्ये कदमांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले की, जाळले हे तपासले पाहिजे, असा थेट गंभीर आरोप अनिल परब यांनी म्हटले.
पुढे परबांनी म्हटले की, 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांना जाळले हे तपासले पाहिजे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचे वाकून हे सुरू आहे. दारू पिऊन तिकडे खेडमध्ये काय धुमाकूळ घालता हे आम्ही अधिवेशनात मांडू असे म्हणत त्यांनी मोठा इशारा दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल शंका उपस्थित करता. मी यांना कोर्टात खेचणार आहे. यांना माफी मागावीच लागणार आहे.
माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, नार्काे टेस्ट झालीच पाहिजे पण 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेतले याचीही नार्काे टेस्ट करा. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेचच बाळासाहेबांचा मृत्यु जाहीर केला. त्यामुळे हा जो आरोप केला आहे, त्या आरोपाचे सत्य बाहेरच आले पाहिजे. मेलेल्या माणसाचे ठसे घेतल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कदमांनी माफी मागावी, नाही तर कायदेशीर कारवाई करणारच असे अनिल परबांनी स्पष्ट म्हटले आहे.