इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युद्धबंदीची घोषणा केली. यादरम्यान इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या 10 ते 12 दिवसांच्या संघर्षात दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या युद्धादरम्यान इस्त्रायलने इराणचे अनेक अणूशास्त्रज्ञ मारले, इराणचे बॅलेस्टिक मिसाइल कारखाने, सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
ज्यामुळे इराणचं मोठ रणनितीक नुकसान केलं असून हे केवळ मोसादमुळे मार्गी लागलं. यानंतर आता शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इराणने मोसादच्या नेटवर्कवर मोठी कारवाई सुरु केली आहे. राज्य समर्थित मीडिया एजेंसी नूर न्यूजने दिलेल्या माहितीनुसार 12 दिवसांच्या युद्धादरम्यान इराणने इस्रायलशी संबंध असल्याच्या संशयावरुन 700 लोकांना पकडलं आहे.
तर हेरगिरी करणाऱ्यांविरोधात इराणने कठोर कारवाई सुरु केली. यादरम्यान इदरीस अली, आजाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल या तिघांना आज सकाळी उरमिया शहरात फाशी देण्यात आली असून, या तिघांनी इराण- इस्त्रायल संघर्षादरम्यान हल्ल्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं इराणमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला. असा दावा इराणच्या हवाल्याने रॉयटर्सने केला आहे.