घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर या मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मुंबईच्या पोटातून धावणारी भूमीगत मेट्रो 3 उद्या म्हणजेच बुधवारपासून संपूर्ण क्षमतेने धावणार असून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतचा प्रवास अवघ्या 70 रुपयांपर्यंत तासाभरात होणार आहे. 33 किलोमीटर मार्ग असलेल्या या मेट्रोचे 27 स्थानके आहेत. यातील 11 स्थानकांवर शेवटच्या टप्प्यात प्रवास सुरू करण्यात येणार आहे. या संपूर्ण मेट्रो स्थानकांपैकी काळबादेवी स्थानक गर्दीच्या वस्तीत असल्याने सर्वाधिक 28 मीटर खोलीवर बनवले आहे.