पुणे येथील मुळशी येथे वैष्णवी हगवणेने हुंड्यापायी जीवन संपवल्याची घटना घडल्यानंतर आता मराठा समाजाने विवाह आचारसंहिता तयार केली आहे. ‘मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो, आपली लेक आपली लढाई’ अशी भूमिका मांडली. पुण्यातील सेंट्रल पार्क हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत शिरोळे, भानुप्रताप बर्गे, श्रीमंत कोकाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आपली भूमिका मांडली. पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने विवाह सोहळ्या संदर्भातील मराठा समाजाची आचारसंहिता यावेळी जाहीर केली.
मराठा समाजाची आचारसंहिता
सध्या प्री-वेडिंगचे वेड तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नाच्या आधी वधू-वराचे शूट करुन त्याचे व्हिडीओ आणि फोटो तयार केले जातात. या सर्वप्रक्रियेला प्री-वेडिंग म्हटले जाते. पण आता मराठा समाजाने या प्री-वेडिंगवर बंदी घातली आहे.
मराठा समाजाने जारी केलेल्या आचारसंहितेमध्ये मुलींच्या वडिलांकडून हुंडा घेणार नाही, तसेच हुंडा देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबामध्ये हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जातो, अशा कुटुंबाला मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल. दरम्यान पीडित महिलेच्या माहेरीची मंडळी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील.
मराठा समाजाने जारी केलेल्या आचारसंहितेमध्ये लग्नाविषयक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये सोहळ्याचा खर्च अर्धा वधू पक्ष तर, अर्धा वर पक्षाने करावा. मराठा समाजकडून सामुहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल. लग्नामध्ये कमीत कमी पाहुण्यांना आमंत्रित करावे. प्रदूषणयुक्त फटाके आणि कर्ण कर्कश्य आवाजाचे डीजे लावू नये. लग्न सोहळ्यामध्ये अनावश्यक खर्च टाळून उरलेली रक्कम वर आणि वधूच्या नावे एफडी FD केली जाईल. दरम्यान काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरुपात दिली जाईल.
मराठा समाजाने या आचारसंहितेची योग्य ती अंमलबजावणी करावी. वैष्णवी हगवणेसारखा क्रूर प्रसंग परत कोणत्याही मुलीवर होऊ नये, यासाठी एका समितीची स्थापना केली. त्या समितीच्या माध्यमातून योग्य तो समन्वय साधला जाणार आहे. मराठा समाजाच्या या निर्णयाचे समाजातील तरुण तरुणींकडून स्वागत होत आहे. समाजाने जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे.