हा चित्रपट पुर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर करण्यात आला आहे. ज्यात संभाजी महारांच्या शौर्याची गाथा दाखवली गेली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 19.08 कोटी रुपये कमवले आहेत. हा चित्रपट बघताना खूप यातना होतील. शेवटच्या अर्ध्या तासात तर खूप रडू येईल. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांचे पात्र जिवंत डोळ्यासमोर उभे केले आहे.
त्यामुळे विकी कौशल याचं नाव आता बॉलिवू़डमध्ये खूप वरच्या स्थानी गेलं आहे. तसेच अक्षय खन्ना याने साकारलेला औरंगजेब हा अंगावर काटा आणणारा आहे. अक्षय खन्नामध्ये हुबेहुब औरंगजेबाची छबी पाहायला मिळते. यासोबतच हंबीरराव मोहिते, कवी कलश आणि इतर मराठा सरदारांच्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत. आता पर्यंत बॉक्स ऑफिसवर छावाने 100 करोडची भरारी घेतली आहे. याचपार्श्वभूमिवर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी या चित्रपटा संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.
शरद पोंक्षे म्हणाले की, "मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. अतिशय उत्तम चित्रपट बनवला आहे. प्रत्येक हिंदूने, प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा. चित्रपट पाहून रक्त खवळतं, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला".
खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहिला
पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, "लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, की त्यांचं कौतुक कराव तितक कमी. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपलं पात्र साकारल आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एआर रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक खूप छान आहे. चित्रपटाचा शेवट पाहवत नाही. औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही".
आताच्या तरुणांना हा चित्रपट पाहावा लागेल
पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, "कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण, आताच्या तरुणांना हा चित्रपट पाहावा लागेल, आणि आपल्या महानायकांकडून शिकावं लागेल. प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदूने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो ‘छावा’ नावाचा चित्रपट आहे, तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि छावा पाहा, असं आवाहन करत शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे".