केंद्र सरकारने एक नवी घोषणा केली. अग्निपथ नावाच्या या योजनेच्या माध्यमातून तरुणांना चार वर्ष सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचं केंद्राने सांगितलं. त्यानंतर आता यावरु देशातील काही राज्यांत अग्नितांडव सुरु आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शेकडो लोकांनी गाड्या आणि रेल्वे स्थानकांची जाळपोळ आणि तोडफोड केली.'अग्निपथ' लष्करी भरती योजनेच्या विरोधात बिहारमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, शनिवारी 50 डबे आणि पाच लोकोमोटिव्ह पूर्णपणे जळून खाक झाले. दानापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार म्हणाले की, प्लॅटफॉर्म, कॉम्प्युटर आणि इतर तांत्रिक उपकरणांचंही मोठं नुकसान झालं आहे.
शुक्रवारी भाबुआ रोड, सिधवालिया आणि छपरा रेल्वे स्थानकांवर पॅसेंजर गाड्यांचे डझनभर डबे पेटवण्यात आले. बरौनी-गोंदिया एक्स्प्रेसचे तीन डबे जळाले. सिवान जिल्ह्यात आंदोलकांनी रेल्वे इंजिन पेटवण्याचा प्रयत्न केला. विक्रमशिला एक्स्प्रेसच्या तीन वातानुकूलित डब्यांची तोडफोड करण्यात आली.
शुक्रवारी बिहारमध्ये 30 गाड्या रद्द करण्यात आल्या
आराह जिल्ह्यातील नवीन बांधण्यात आलेला प्लॅटफॉर्म आणि मोतिहारीमधील बापुधाम रेल्वे स्थानक यासारख्या रेल्वे स्थानक परिसराचीही तोडफोड आणि नासधूस करण्यात आली. यादरम्यान एक प्रवासीही जखमी झाला. पूर्व मध्य रेल्वेने सांगितलं की, चार एक्स्प्रेससह 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आणि इतर गाड्या काही तास उशिराने धावल्या. तर काही गाड्या या हिंसाचारादरम्यान अडकल्या होत्या.