राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ऑनलाइन प्रणालीच्या (साथी पोर्टल फेज-२) विरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने (एमएएफडीए) मंगळवारी (दि. २८) राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय बंद पाळणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा खते, बियाणे, कीटकनाशके डीलर्स असोसिएशनने पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव संग्राम पवार व अध्यक्ष छबूराव हराळ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. जिल्हा संघटनेने या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनाही निवेदन देऊन ही माहिती दिली आहे. संघटनेच्या निवेदनात म्हटले, की साथी पोर्टल फेज-२ प्रणालीमुळे कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या विक्रेत्यांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया, तांत्रिक अडचणी, तसेच व्यवहारात अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी खते, बियाणे, कीटकनाशके आदी वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.