पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार मोठ्या यात्रा भरतात. आता या यात्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट, नदीपात्र, भक्ती सागर 65 एकर परिसर, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, शहरातील प्रमुख रस्ते या भागात वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. याची चाचणी मंगळवारी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली.
यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदर तयारी केली जाते. आता प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवली जात आहे.
याविषयी पंढरपूरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांनी सांगितले की, "या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे. चेहऱ्याची ओळख बघून हरवलेली किंवा मदतीची गरज असलेले लोकांची माहिती व त्यांच्या हालचालीचे विश्लेषण देखील करता येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी मोजणे व व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे."