महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने केवळ सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली आणि मराठी अस्मितेला पायदळी तुडवलं, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना भाजपला सत्तेचा अडथळा वाटत होती, म्हणून भाजपने योजनाबद्धपणे शिवसेना तोडण्याचे काम केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
इम्तियाज जलील म्हणाले की, "जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना आहे, तोपर्यंत भाजपला सत्ता मिळणार नाही, हे भाजपला ठाऊक होतं. म्हणूनच त्यांनी शिवसेनेत फूट पाडली." ते पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असताना देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट पचली नव्हती. त्यांच्या हावभावातून आणि देहबोलीतून याची स्पष्ट कल्पना आली होती की मुख्यमंत्री मला व्हायला हवं होतं, असं फडणवीस यांना वाटत होतं, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली.
जलील यांनी असा दावाही केला की, "फडणवीस यांना माहीत आहे, जे शिवसेना सोडून त्यांच्याकडे आले, ते उद्या त्यांनाही सोडून जाऊ शकतात. त्यामुळे फडणवीस यांनी शिंदेंच्या बरोबरीने स्वतःची वेगळी व्यवस्था निर्माण केली आहे." भाजपवर टीका करताना जलील म्हणाले, "भाजपने बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रावर गुजराती नेतृत्व लादण्याचा डाव रचला. भाजप केवळ मराठी माणसासोबतच नव्हे तर संपूर्ण देशाशी विश्वासघात करत आहे."
"देश आणि महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजपला संपवावे लागेल," असा थेट इशाराही त्यांनी दिला. तसेच, भाजपविरोधात जर वेगळे झालेले ठाकरे बंधू उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी जलील म्हणाले, "आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. आम्ही आमची लढाई लोकांच्या हितासाठी एकटेच लढतो. ठाकरे बंधू एकत्रित आल्याने पुढच्या काही दिवसांत कोणाला फायदा होतो आणि कोणाचे नुकसान होते, ते स्पष्ट होईलच. असे म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आल्याने राजकीय भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा देत पुढील कारकिर्दीस प्रोत्साहन दिले.