ताज्या बातम्या

Ashish Shelar : सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधा गरजेची; ॲड. आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. याच अनुषंगाने वांद्रे रेक्लेमेशन परिसरात सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे–वरळी सी लिंक आणि संपूर्ण कोस्टल रोडसारख्या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई आपत्कालीन सुविधांची नितांत गरज असल्याचे मत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. याच अनुषंगाने वांद्रे रेक्लेमेशन परिसरात सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर अपघात घडला होता. या दुर्घटनेमुळे तब्बल 36 तासांहून अधिक काळ वाहनचालक आणि प्रवासी अडकून पडले होते. या घटनेने राज्यातील प्रमुख वाहतूक मार्गांवरील आपत्कालीन व्यवस्थापनातील मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील कोस्टल रोड आणि सी लिंकसारख्या मार्गांवर एखादी मोठी दुर्घटना, आग, स्फोट किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने प्रतिसाद देणे किती आव्हानात्मक ठरू शकते, याकडे पालकमंत्री ॲड. शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात ॲड. शेलार यांनी नमूद केले आहे की, कोस्टल रोड हा काही ठिकाणी भुयारी असून काही भाग समुद्रावरून जातो. अशा ठिकाणी अपघात झाल्यास जखमींना त्वरित बाहेर काढणे, रुग्णालयात हलवणे तसेच पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि एनडीआरएफ यांची जलद हालचाल करणे अत्यंत कठीण ठरू शकते. त्यामुळे पारंपरिक रस्तेमार्गांवर अवलंबून राहण्याऐवजी हवाई आपत्कालीन सुविधांचा समावेश करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या अनुषंगाने वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, वांद्रे–वरळी सी लिंकच्या जवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे ॲड. शेलार यांनी अधोरेखित केले आहे. या ठिकाणी हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून, योग्य नियोजन केल्यास अल्पावधीत ही सुविधा कार्यान्वित करता येऊ शकते, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने निर्देश देऊन आवश्यक निर्णय घेण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेलिपॅड उभारल्यास कोस्टल रोड किंवा सी लिंकवर घडणाऱ्या आपत्कालीन घटनांमध्ये जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचवता येईल. विशेषतः लीलावती रुग्णालयासह मुंबईतील इतर प्रमुख रुग्णालयांशी जलद संपर्क साधता येणार आहे. यामुळे जीवितहानी कमी करण्यास मोठी मदत होईल.

तसेच या हवाई सुविधेमुळे पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आणि आधुनिक आपत्कालीन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा