युरोपातील प्रमुख विमानतळांवरील चेक-इन आणि बोर्डिंग प्रणालींवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे. लंडनच्या हिथ्रोसह काही विमानतळांवरील प्रणाली शनिवारी सेवा पुरवठादाराच्या सॉफ्टवेअरवरील हल्ल्यानंतर बंद पडल्या.
सिरियम या विमानवाहतूक डेटा संस्थेच्या माहितीनुसार हिथ्रो, बर्लिन आणि ब्रुसेल्स विमानतळांवर किमान 29 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी हिथ्रोहून 651, ब्रुसेल्सहून 228 आणि बर्लिनहून 226 उड्डाणे होणार होती. युनायटेड किंगडममधील सर्वात व्यस्त असलेल्या हिथ्रो विमानतळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे कॉलीन्स एरोस्पेसने मान्य केले. ही कंपनी अनेक विमानकंपन्यांसाठी चेक-इन आणि बोर्डिंग प्रणाली उपलब्ध करून देते.
कॉलीन्स एरोस्पेस ही अमेरिकेतील मोठी एरोस्पेस व लष्करी कंपनी असून ती RTX कॉर्पोरेशन (पूर्वी रेथियॉन टेक्नॉलॉजीज) ची उपकंपनी आहे. कंपनीने काही विमानतळांवर “सायबर व्यत्यय” आल्याचे सांगितले. “या समस्येचा परिणाम इलेक्ट्रॉनिक चेक-इन आणि बॅगेज ड्रॉपपुरताच मर्यादित आहे, मात्र मॅन्युअल चेक-इनद्वारे सेवा सुरू ठेवता येते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रुसेल्स व बर्लिन विमानतळांनीही आपल्यावर परिणाम झाल्याचे मान्य केले. स्वयंचलित प्रणाली ठप्प झाल्यामुळे मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंगची व्यवस्था करण्यात आली. “यामुळे उड्डाण वेळापत्रकावर मोठा परिणाम होत असून रद्दबातल व विलंब होण्याची शक्यता आहे,” असे ब्रुसेल्स विमानतळाने सांगितले. हा हल्ला शुक्रवारी रात्री झाल्याचे त्यांनी नमूद केले. बर्लिन विमानतळाने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले की, “सिस्टम पुरवठादाराच्या तांत्रिक समस्येमुळे चेक-इनला जास्त वेळ लागत आहे. आम्ही तातडीने उपाय शोधत आहोत.”
दरम्यान, जर्मनीतील सर्वात मोठा फ्रँकफर्ट विमानतळ व झुरिच विमानतळ या हल्ल्याने प्रभावित झाले नाहीत. जर्मनीच्या BSI (फेडरल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिस) ने बर्लिन विमानतळाशी संपर्क साधून माहिती दिली की, “इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्यत्यय आला असला तरी विमान सुरक्षेला धोका नाही.”
पॅरिसमधील शार्ल द गॉल, ऑर्ली आणि ले बर्जे विमानतळांनी कोणतीही अडचण नोंदवली नाही. युरोपमधील मोठी विमानकंपनी इझीजेटने आपली उड्डाणे नियमित सुरू असल्याचे सांगितले. अमेरिकन डेल्टा एअरलाईन्सनेही अल्प परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली असून पर्यायी प्रणाली वापरून व्यत्यय कमी केल्याचे सांगितले.
आयर्लंडमधील डब्लिन विमानतळाने जाहीर केले की, खबरदारी म्हणून त्याचे टर्मिनल 2 काही काळासाठी रिकामे करण्यात आले होते. नंतर टर्मिनल पुन्हा सुरू करण्यात आले, मात्र दिवसातील उड्डाणांवर काही प्रमाणात व्यत्यय राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “युरोपभरातील सॉफ्टवेअर समस्येमुळे काही विमानतळांवर किरकोळ परिणाम होत आहे,” असेही सांगण्यात आले. या सायबर हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने, व्यक्तीने किंवा देशाने घेतलेली नाही. तसेच प्रवाशांच्या डेटाची चोरी झाल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.