राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केलेला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच हा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पाहायला मिळाली. यानंतर आता फडणवीसांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे. मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना अजित पवार यांच्यसोबत घेतलेल्या शपथविधीवर गौप्यस्फोट केले होते. “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.