सांगलीतील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी भाषणात आमदार रोहित पवारांना उद्देशून हलक्या फुलक्या शैलीत टोला लगावत वातावरण रंगवले.
रोहित पवार यांनी या कार्यक्रमात 40 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, “पूर्वी अजितदादा माझ्याकडे लक्ष देत होते. मी पहिल्यांदा अधिवेशनात भाषण केलं तेव्हा त्यांनी स्वतः फोन करून कौतुक केले होते. पण आता ते गावकीकडे लक्ष देतात, मात्र भावकीला विसरलेत.”
या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “रोहित खूप चुरू चुरू बोलतोय. निधी जाहीर करताना म्हटलं चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं, जयंतरावांनी अजून एक पूज्य वाढवावं आणि अजितदादांनी अजून एक पूज्य वाढवावं, एवढंच बाकी राहिलं होतं. फार गाडी फास्ट चालली होती म्हणून थोडं थांबवलं.”
ते पुढे म्हणाले, “काही जण म्हणतात दादांचं गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे नाही. अरे, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतरावांना विचारा, किती मते मिळाली. पोस्टल बॅलेटमुळे निवडून आला. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करतो. आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचं आहे.”