ताज्या बातम्या

Pune Municipal Corporation Election : अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध

राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून प्रत्येक शहरात राजकीय समीकरणे वेगळी पाहायला मिळत आहेत.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून प्रत्येक शहरात राजकीय समीकरणे वेगळी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पक्षांनी युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही शहरांमध्ये पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. राज्यपातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती सत्तेत असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार भाजपाविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या दोन महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले असून, संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींकडून संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे हे प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसल्याने ‘काका-पुतण्या’ एकत्र आल्याचे स्पष्ट चित्र जनतेसमोर आले.

जाहीरनाम्याचे वाचन करताना अजित पवार यांनी आगामी काळात पुणेकरांसाठी पाच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक त्या पाण्याच्या उंच टाक्या उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत, पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय शिक्षण आणि गृहनिर्माण या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शहरातील नवीन शाळांना मान्यता दिली जाईल, तसेच झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस योजना राबवण्यात येईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मूलभूत सुविधा कशा वाढवता येतील, यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका अजित पवार भाजपासोबत लढणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेर भाजपासोबत युती न करता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झाले. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अजित पवार आणि त्यांच्यातील कौटुंबिक संबंध कायमच चांगले राहिले असून ते कधीही दुरावले नाहीत. राजकीय मतभेद पूर्वीही होते आणि आजही आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने युती करणे हे सर्वच पक्षांमध्ये होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ही राष्ट्रवादींची एकत्रित लढत आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा