महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंवेदनांचा वर्षाव होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्दैवी घटनेवर तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेला असून, या अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
“महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. या गहन दुःखाच्या क्षणी ईश्वर शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य देवो, यासाठी मी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “श्री अजित पवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराष्ट्राच्या जनतेची निःस्वार्थ सेवा करणारे, मेहनती आणि कर्तव्यदक्ष नेते म्हणून त्यांचा सर्वत्र सन्मान केला जात असे.”
प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि गरीब व वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न हे नेहमीच प्रेरणादायी राहतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. “त्यांचे अकाली जाणे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी मोठी हानी आहे,” असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य समर्थकांना धीर देणाऱ्या शब्दांत संवेदना व्यक्त केल्या. या शोकसंदेशासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यासोबतचे काही स्मरणीय क्षणांचे फोटोही शेअर केले असून, “ओम शांती” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.