महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की विमान जळून खाक झाले आणि अजित पवारांसह काही इतर व्यक्तींना प्राण गमवावे लागले. या दुःखद घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्णायक नेते होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता अत्यंत जास्त होती. स्पष्टवक्तेपणा, कठोर प्रशासनिक निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध यामुळे ते नेहमीच चर्चा केंद्रबिंदू ठरत. त्यांच्या अकाली निधनाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती विमानतळाजवळील अपघातामुळे परिसरात तातडीने बचावकाम चालू झाले आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तांत्रिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उपमुख्यमंत्री, जलसंपदा, अर्थ, नियोजन अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी प्रशासनावर ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने राज्याला एक प्रखर आणि कार्यक्षम नेतृत्व गमावावे लागले आहे. राज्यभरात नागरिक आणि कार्यकर्ते शोक व्यक्त करत असून, विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या योगदानाची आठवण महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहणार आहे.