ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, उद्धव व रश्मी ठाकरे बारामतीत, सुनेत्रा पवारांचं केलं सांत्वन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

Published by : Varsha Bhasmare

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी (२८ जानेवारी) बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून चार जाहीर सभांसाठी बारामतीकडे रवाना झालेले खासगी विमान सकाळी सुमारे ८ वाजता उड्डाण केल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच बारामतीतील रनवे परिसरालगत असलेल्या एका शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाला भीषण आग लागली आणि सलग तीन ते चार मोठे स्फोट झाले. या अपघातात विमानातील कोणीही जिवंत राहू शकले नाही.

या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. कठोर प्रशासक, धडाडीचा नेता आणि जनतेशी थेट नातं जपणारे ‘अजितदादा’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्यभर शोककळा पसरली.

अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले. ही बातमी समजताच संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी तातडीने बारामतीकडे प्रयाण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही मुंबईहून बारामतीत दाखल झाले. दिवसभर बारामतीत कार्यकर्ते, नागरिक आणि नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी बारामतीत येऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह बारामतीत दाखल झाले. त्यांनी सुनेत्रा पवार आणि कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी संपूर्ण वातावरण सुन्न झाले होते.

आज गुरुवारी सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानातून अजित पवारांची अंत्ययात्रा निघणार असून सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांचा मृत्यू हा अपघाती असून त्यामागे कोणताही घातपात नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. “त्यांच्या निधनाचे राजकारण करू नका, ही राज्यासाठी मोठी हानी आहे,” असे सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा